पत्नीला कारमध्ये प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले....

Foto
बीड : बीडमध्ये असताना एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धाराशिवला बदली झाली. पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर महिन्यापासून त्याच पीडितेवर पुन्हा प्रेम जडले. दोघेजण कारमधून फिरताना पतीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यावर प्रियकर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे याला कपडे फाटेपर्यंत बदडले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी 2 वाजता बीड शहरातील बसस्थानकासमोर घडला. अजब प्रेमाच्या या गजब कहाणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

रवींद्र शिंदे हे पोलिस उपनिरीक्षक म्हणून 2013 साली बीड पोलिस दलात भरती झाले. पीडिता आणि शिंदे हे शेजारीच राहत असल्याने ओळख झाली. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केला. बीडहून शिंदे यांची बदली धाराशिवला झाली. परंतु त्याने त्रास देणे सोडले नाही. पिस्तूलचा धाक दाखवून त्याने जून आणि जुलै 2025 मध्ये पीडितेवर घरात घुसून अत्याचार केला. तसेच तिला मारहाणही केली. यात पीडिता गर्भवतीही राहिल्याची माहिती आहे. याप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शिंदेविरोधात अत्याचारासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो फरारच आहे. शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी कोणतेही प्रयत्न न करता त्याला अभय दिल्याचा आरोप पीडितेच्या पतीने केला.

शुक्रवारी नेमके काय घडले?


पीडिता आणि रवींद्र शिंदे हे कारमधून (एमएच 23 बीसी 3402) बीड शहरातील भाग्य नगर भागात होते. पीडितेच्या पतीने पाहताच पाठलाग केला. तुळजाई चौक, नगर नाका, बसस्थानक मार्गे बाहेर जाण्यापूर्वीच पतीने दुचाकी आडवी लावून शिंदेला खाली खेचले. त्याला कपडे फाटेपर्यंत बदडले. पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेही तोंड बांधून होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठत शिंदेविरोधात तक्रार दिली.

फरार; तरीही पोलिसांसमोरून पळाला


शिंदे हा अत्याचाराच्या गुन्ह्यात फरार आहे. असे असतानाही तो बीडमध्ये येऊन पीडितेला घेऊन फिरत होता. शुक्रवारी दुपारीही पोलिसांनी हा वाद मिटवला. पीडितेसह पतीला पकडले. परंतु आरोपी असलेल्या एपीआय शिंदेला अभय दिले. त्यामुळे त्याने तेथून धूम ठोकली. शिंदे हा आरोपी आहे, हे माहीतच नाही, असा खुलासा पोलिसांनी केला. तर शिवाजीनगर पोलिसांनी यावर तोंडावर बोट ठेवले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

पीडिता तीन दिवसांपासून गायब


पीडिता ही तीन दिवसांपासून घरी आली नव्हती. त्यामुळे पीडितेच्या पतीला संशय आला. शुक्रवारी दुपारी तो खरा ठरला. त्याने पीडिता आणि एपीआय शिंदे यांना कारमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेले. पीडितेने शिंदेविरोधात तक्रार देण्याऐवजी पतीवरच आरोप केले. परंतु पोलिसांना सर्व माहिती असल्याने त्यांनी तिला शांत केले. त्यानंतर तिच्या पतीच्या तक्रारीवरून एपीआय शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला.\

शिंदे बीडमध्ये येतो, तरी अटक का नाही?


पाहिजे, फरारी आरोपी बीड शहरात बिनधास्त फिरत असतानाही पोलिस त्याला पकडत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. त्यातच शुक्रवारी घडलेल्या घटनेने याला आणखी दुजोरा मिळाला. पोलिस अधिकारी शिंदे हा आरोपी असतानाही शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अगोदरच खून, जीवे मारण्याच्या प्रयत्न अशा गंभीर घटना राजरोस घडत आहेत. त्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अभय दिले जात असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.